मधूमेह व रक्तदाबापासून किडनीचा बचाव...!
जगात मधूमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहे. त्यामुळे भारताला मधूमेहाची जागतिक राजधानी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मधूमेहाच्या एकूण सहा पैकी एका रुग्णाला रुग्णाला किडनी निकामी होण्याचा धोका संभवतो. मधूमेहाच्या आजाराच्या प्रभावात किडनी आली, तर एका टप्प्यानंतर ती कमकुवत होऊन विशिष्ट कालावधीनंतर पूर्णपणे निकामी होण्याची शक्यता असते. डायलिसिसवर असलेल्या एकूण रुग्णांपैकी 40 टक्के रुग्णांची किडनी मधूमेहामुळे निकामी झाल्याचे नोंद आहे. सगळ्याच मधूमेहग्रस्तांच्या किडनीस दुष्परिणामापासून टाळता येत नसले, तरी विशेष काळजी घेतला तर हा धोका निश्चितच कमी होऊ शकतो. एकदा जर मधूमेहामुळे किडनी निकामी होण्याची प्रक्रिया सुरू झाली तर किडनीस पूर्ववत करण्यासाठी उपाय नाही. मात्र, योग्य काळजी घेतल्यास ज्यांच्या किडनीवर दुष्परिणाम झाले आहेत, अशा रुग्णांची किडनीच्या कार्यान्वयनाचा कालावधी वाढवता येऊ शकतो. टाईप 1 (टाईप वन) मधूमेहामध्ये वीस वर्षांनंतर 50 टक्के रुग्णांच्या किडनीस हानी पोहचते. टाईप 2(टाईप टू) मधूमेहामध्ये सर्वसाधारणपणे असे अंदाज होता की, 8 ते 10 वर्षात किडनीवर दुष्परिणाम होईल. मात्र, असेही आढळून आले आहे की, बर्याच रुग्णांना एवढासुद्धा कालावधी मिळत नाही. बहुतेकदा तर निदान झाल्या-झाल्या किडनीवर प्रभाव पडू लागतो. मधूमेहग्रस्तांपैकी कुठल्या रुग्णाच्या किडनीचे नुकसान होणार; हे जाणून घेणे देखील अतिशय कठीण किंबहुना अशक्यच आहे. रुग्णांना दीर्घकाळापासून मधूमेह असेल, त्यांची रक्तशर्करा नियंत्रणात नसेल, मधूमेहाचा डोळ्यांवरही परिणाम झालेला असेल, रक्तदाब देखील नियंत्रणात नसेल आणि परिवारात कुणाची किडनी मधूमेहामुळे ग्रसित झाली असेल, तर अशा व्यक्तीच्या किडनीवर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. मधूमेहामुळे नेमकं काय होतं तर रक्तशर्करा फार कालावधीसाठी वाढलेली असल्यास प्रोटिन परिवर्तित होऊ लागते. हे परिवर्तित झालेले प्रोटिन किडनीच्या फिल्टरमध्ये म्हणजे नेफ्रॉनमध्ये अडकतात. शिवाय मुत्रमार्गाद्वारे प्रोटिन शरीराबाहेर जाणे सुरू होते. त्यामुळे प्रोटिनचे प्रमाण कमी व्हायला लागते. मग रक्तदाब वाढू लागतो आणि किडनीची रक्तशुद्धीकरणाची क्षमता कमी होऊ लागते. ही क्षमता कमी होत होत एका बिंदूला किडनी निकामी होते. ही प्रक्रिया दोन्ही किडन्यांमध्ये एकाच क्षणाला ही प्रक्रिया सुरू होते. मधुमेहामुळे किडनीवर दुष्परिणाम होण्यास सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अनियंत्रित रक्तशर्करा. मधूमेहात किडनीचे रक्षण करण्यासाठी रक्तशर्करा नियंत्रित करणे अत्यावश्यक आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या नियमित घेऊन, आहारावर नियंत्रण ठेवत व्यामाम करून रक्तशर्करा नियंत्रणात ठेवावी. शिवाय कुठलाही त्रास नसतांना नियमित्रपणे तपासणी करून घ्यावी. तंबाखूचे सेवन केल्याने किडनीवरचे दुष्परिणाम शीघ्र गतीने होतात. मधुमेहग्रस्त व्यक्ती नियमित रक्तशर्करा तपासणी करीत असेल. मात्र, लघवीद्वारे प्रोटिन जातेय का, रक्तामधील लिपीड वाढतय का हे तपासणे आणि ब्लड प्रेशर 130 बाय 85 पेक्षा कमी ठेवत व किडनी कशी काम करते हे तपासण्याची रक्तातील सिरम क्रियाटिनीन चाचणी सहा महिन्यातून एकदा करणे अत्यावश्यक आहे. मधूमेहामुळे किडनीवर प्रभाव पडत असल्यास, लघवीतून प्रोटिन जात असल्यास व सिरम क्रियाटिनिनचे परिणाम वाढत असल्यास नियमित घेण्याच्या गोळ्या बंद करून इंसुलिनचे इंजेक्शन सुरू करणे आवश्यक आहे. अन्यथा शर्करेचा स्तर कमी होऊन कोमामध्येही जाण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. धनंजय ऊकळकर,
कंसल्टंट नेफ्रोलॉजिस्ट,
अश्विनी किडनी व डायलेसिस सेंटर
नागपूर